सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; १८ जूनला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान.

प्रतिनिधी -सोलापूर, 
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदार नोंदणीकृत असले तरी एका मतदाराच्या निधनामुळे ६१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका आणि १७ नगरपरिषद/नगरपंचायती अशा एकूण १९ संस्थांमधील प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एकूण मतदारसंख्येत जिल्हा परिषद सदस्य ६८, पंचायत समिती सभापती ११, सोलापूर महानगरपालिका नगरसेवक १०२, स्वीकृत अथवा नामनिर्देशित सदस्य ९, नगरपालिका व नगरपंचायतींमधील सदस्य ३७४, नामनिर्देशित सदस्य ४० आणि नगरपंचायत अध्यक्ष १२ यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी सुरुवातीला १५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. छाननी व माघारीनंतर अंतिमतः दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्ह्यात सहा मतदान केंद्रे
निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार कुर्डूवाडी येथे ८०, उत्तर सोलापूर येथे १८८, दक्षिण सोलापूर येथे ८९, पंढरपूर येथे १००, मंगळवेढा येथे ६२ आणि अकलूज येथे ९७ मतदार मतदान करणार आहेत. पुरुष आणि महिला मतदारांची संख्या प्रत्येकी ३०८ इतकी आहे.
मतदान केंद्रांवर तहसीलदार केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहणार असून नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक आणि शिपाई यांची मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना
मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम अंकात नमूद करणे आवश्यक आहे. पहिली पसंती दर्शविण्यासाठी ‘१’ हा अंक लिहिणे बंधनकारक आहे. मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलेला जांभळा स्केचपेन वापरणे आवश्यक राहणार आहे. अंक शब्दांत लिहिल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नोंद केल्यास संबंधित मतपत्रिका अवैध ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.