ग्रामीण पत्रकारांना एसटीत मोफत प्रवासाची मागणी; पत्रकार सुरक्षा समितीचे काळी फीत व काळी टोपी परिधान करून आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने रविवारी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन गेट येथे काळी फीत आणि काळी टोपी परिधान करून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. सामाजिक बांधिलकी जपत ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध शासकीय कार्यालये आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी वारंवार जिल्हा मुख्यालयावर जावे लागते.
अनेक ग्रामीण पत्रकार अत्यल्प मानधनावर काम करत असल्याने खासगी वाहन किंवा मोटारसायकलचा खर्च परवडत नाही. वाढत्या इंधनदरांमुळे आणि लांबच्या प्रवासामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येत असून, वार्तांकनासाठी जिल्हा ठिकाणी येणे-जाणे जिकिरीचे ठरत आहे. याशिवाय दुर्गम भागातून मोटारसायकलने होणारा प्रवास धोकादायकही असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने ६ मार्च २०२५ रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच ५ मार्च २०२६ रोजी पुणे विभागीय आयुक्तांनाही निवेदन सादर करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली होती. यापूर्वीही सोलापूरमध्ये लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते. मात्र अद्याप शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
आंदोलनादरम्यान पत्रकारांनी—
“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही”
“पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो”
“आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”
“ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळाला पाहिजे”
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ग्रामीण पत्रकारांना मोफत प्रवासासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, मागणी मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, जिल्हा सचिव अंबादास गज्जम, शहराध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्यकारी शहराध्यक्ष वसीमराजा बागवान, शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, दत्तात्रय पवार, श्रीनिवास पेद्दी, सादिक शेख, विष्णू सकट, संदीप धोत्रे, सुधीर डोळे, अकबर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
----------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंवे 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.