पूरात निकामी झालेल्या श्रवणयंत्राला नवा आधार; स्वराजच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलले हास्य.


प्रतिनिधी -सोलापूर,
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिऱ्हे येथील कर्णबधिर विद्यार्थी कु. स्वराज सत्यवान शेळके (इयत्ता ६ वी) याला नवीन श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. पूरामुळे निकामी झालेल्या जुन्या श्रवणयंत्राऐवजी नवीन यंत्र मिळाल्याने स्वराजच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
गतवर्षी पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे स्वराजच्या श्रवणयंत्रात पाणी शिरले होते. त्यामुळे ते पूर्णपणे बंद पडले आणि त्याला शालेय शिक्षणासह दैनंदिन संवादात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत नवीन श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले.
श्रवणयंत्राचे वितरण शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार आणि प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक शिरशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक परमेश्वर गामाजी, विशेष शिक्षक आकाश शेंद्रे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे अमित शहा, विद्यार्थ्याचे पालक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यापूर्वीही शिक्षण विभागामार्फत स्वराजला श्रवणयंत्र देण्यात आले होते. मात्र अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ते निकामी झाल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होत होता. विद्यार्थ्याची गरज ओळखून जिल्हा समन्वयक परमेश्वर गामाजी यांनी पुढाकार घेत नवीन श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले.
नवीन श्रवणयंत्रामुळे स्वराजच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार असून त्याच्या संवाद कौशल्यांच्या विकासासह मुख्य प्रवाहातील शिक्षणात प्रभावी सहभागासाठीही मोठी मदत होणार आहे. विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांप्रती शिक्षण विभागाच्या संवेदनशीलतेचे आणि बांधिलकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विद्यार्थ्यांच्या गरजांबाबत संवेदनशीलता दाखवत तातडीने दखल घेतल्याबद्दल संबंधित शिक्षक व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
-----------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.