कलारीप्पायटटू राज्य पंच परीक्षेत दशरथ काळे यांचे यश.

 
प्रतिनिधी -सोलापूर 
मराठी कलारीप्पायटटू असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच परीक्षेत मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक दशरथ काळे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना कलारीप्पायटटूचे प्रशिक्षण देत असून अनेक गुणवंत खेळाडू घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांपर्यंत मजल मारली आहे. याच अनुभव, अभ्यास आणि प्रशिक्षणाच्या बळावर त्यांनी राज्य पंच परीक्षेत यश मिळविले.“प्रथम महाराष्ट्र राज्यस्तरीय कलारीप्पायटटू पंच आणि प्रशिक्षक शिबिर २०२६-२७” हे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर दि. २४ ते २६ मे २०२६ दरम्यान भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात छत्रपती संभाजीनगर, सांगली, नांदेड, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, नागपूर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील सुमारे ५० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.स्तर-१ च्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये कलारीप्पायटटू या भारतीय पारंपरिक युद्धकलेचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. चुवाडू, हाय किक आणि कायपोरू या स्पर्धात्मक प्रकारांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केरळच्या पारंपरिक पद्धतीतील विविध व्यायाम प्रकार, शरीर नियंत्रण तंत्र आणि ‘पुथुरावंदन’ यांचेही प्रशिक्षण देण्यात आले.
याशिवाय स्पर्धांमध्ये खेळाडूंचे मूल्यांकन, गुणांकन पद्धती, तांत्रिक निरीक्षणे आणि न्यायाधीश म्हणून आवश्यक असलेले नियम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. अठरा वर्षांखालील खेळाडूंच्या तांत्रिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात निखिल पांढरे आणि कौस्तुभ यांनी प्रशिक्षक म्हणून तर राज्य संघटनेचे सचिव निलेश वाळिंबे यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
कलारीप्पायटटू ही केरळ राज्यातील प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असून त्यामध्ये लाठी-काठी, ढाल-तलवार, दांडपट्टा यांसारख्या विविध शस्त्रप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर इंडियन कलारीप्पायटटू फेडरेशन तर महाराष्ट्रात मराठी कलारीप्पायटटू असोसिएशन कार्यरत आहे. सोलापूर जिल्ह्यातही कलारीप्पायटटू असोसिएशन सोलापूर जिल्हा या खेळाच्या प्रसारासाठी कार्यरत आहे.
नुकताच या क्रीडा प्रकाराचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला असून दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने कांस्यपदक पटकावले आहे. तसेच खेलो इंडिया यूथ गेम्स, खेलो इंडिया नॅशनल लीग आणि नॅशनल गेम्समध्येही या खेळाचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्राच्या संघाने या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.दशरथ काळे यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या यशामुळे मोहोळच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.