बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’; धनेश आचलारे मित्र मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम.

प्रतिनिधी - बोरामणी,
 सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात, हजारो वऱ्हाडी मंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी येथे शुक्रवारी सायंकाळी ६.२१ वाजता एस.व्ही.सी.एस. प्रशालेच्या प्रांगणात पाच जोडप्यांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थितांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्या पुढाकारातून गेल्या १४ वर्षांपासून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून आतापर्यंत २७८ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत.विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संयोजन समितीतर्फे वधूंना मणी-मंगळसूत्र, सौभाग्य अलंकार, शालू तर वरांना सफारी पोशाख तसेच हळदीचे कपडे देण्यात आले. वधू-वरांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आकर्षक मंडपात धार्मिक मंत्रोच्चारात मंगल अक्षता सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास खासदार डॉ. ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, दिलीप सिद्धे, बाळासाहेब वाघमारे, सुनील बनसोडे, आनंद तानवडे, सुदर्शन साठे यांच्यासह बोरामणी गटातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संयोजक धनेश आचलारे यांनी सांगितले की, विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना पहिली कन्या झाल्यास ‘मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कन्यारत्न’ योजनेअंतर्गत त्या मुलीच्या नावाने ११ हजार रुपयांची ठेव बँकेत जमा करण्यात येणार असून, १८ वर्षांनंतर वाढीव रक्कम संबंधित मुलीस देण्यात येईल.हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आचलारे मित्र परिवार, ग्रामस्थ व कुटुंबीयांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.