कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे १७ एप्रिल रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या माहितीनुसार, संचमान्यता, शालार्थ प्रणाली, नियमित वेतन, थकीत वेतन देयके, वरिष्ठ निवड वेतनश्रेणी तसेच पेन्शन आदी विविध बाबींमध्ये शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊनही थकीत वेतनाची बिले मंजूर न करता निधी परत पाठवण्यात आल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कामकाजाबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून, कामे वेळेत होत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून सध्याचे उपसंचालक निर्णय घेण्यात निष्क्रिय असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले की, शिक्षकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत असून त्यातून अनावश्यक त्रास दिला जात आहे. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे यांनीही शिक्षकांच्या समस्यांचे एकाच वेळी निराकरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.यापूर्वी जानेवारी महिन्यात संघटनेने मोर्चा काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. त्यानंतर १२ मार्च रोजी पुन्हा मोर्चा काढण्यात आला, तरीही समस्यांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे मुंबई विभागाचे अध्यक्ष प्रा. दीक्षित यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना नियमित वेतन मिळण्यात मोठा विलंब होत असून गेल्या दोन वर्षांत एकदाही वेळेवर वेतन मिळाले नसल्याची माहिती प्रा. भानुदास बिरादार यांनी दिली. संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. रवींद्र भदाने यांनीही शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षकांचे नुकसान होत असल्याचे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी १७ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी होणार आहेत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
१) निष्क्रिय शिक्षण उपसंचालक व सहाय्यक शिक्षण संचालक यांची बदली करावी.
२) मार्च महिन्याचे वेतन त्वरित द्यावे व सर्व थकीत देयके मंजूर करावीत.
३) रिक्त पदांची १००% भरती करावी.
४) सर्व शिक्षकांना विलंब न लावता शालार्थ प्रणाली लागू करावी.
५) संघटनेने मांडलेल्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करावे.
दरम्यान, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना आंदोलनाची नोटीस देण्यात आली असून त्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली आहे.
“चलो आझाद मैदान” या घोषणेसह शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा उभारण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.