शक्ती अॅटो अँड ट्रॅक्टर कंपनीतर्फे ‘गौरव नारी शक्तीचा’ उपक्रम उत्साहात.
प्रतिनिधी -अक्कलकोट
जागतिक महिला दिनानिमित्त “गौरव नारी शक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शक्ती अॅटो अँड ट्रॅक्टर कंपनी, अक्कलकोट यांच्या वतीने करण्यात आले. शेती, समाज आणि कुटुंब व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला शेतकरी भगिनींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता हसापूर रोड बायपास ब्रिज येथील शक्ती अॅटो ट्रॅक्टर कंपनी परिसरात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शांभवी सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, आकांक्षा अग्रवाल, आसावरी सराफ, शुभम अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ, सेक्रेटरी युगंधर शिंदे, रोटरी क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष गुरुशांतप्पा पाटील व सेक्रेटरी प्रदीप तोरस्कर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रेमा शिवशंकर पाटील व शिवशंकर पाटील यांनी मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार केला.प्रास्ताविक करताना शिवशंकर पाटील यांनी सांगितले की, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वराज ट्रॅक्टरच्या माध्यमातून दर्जेदार व खात्रीशीर सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना शिवशंकर पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला भगिनींचा सन्मान करून त्यांनी स्तुत्य कार्य केले असून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले.
कार्यक्रमात कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, कृषी अधिकारी माळी साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवर महिलांनीही मनोगत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमादरम्यान समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ महिला शेतकरी भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. महेश पवार व त्यांच्या टीमने शिबिरात सेवा दिली. या शिबिराचा सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमात प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान, तज्ञ महिला डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत चष्म्यांचे वाटप, मोतीबिंदू असलेल्या महिलांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा तसेच महिंद्रा फायनान्सतर्फे माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. उपस्थित महिला शेतकरी भगिनी व शेतकरी बांधवांना महिंद्रा फायनान्सच्या वतीने विशेष भेटवस्तूही देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज ट्रॅक्टर अक्कलकोटचे सेल्स मॅनेजर सागर काकमारे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. प्रेमा शिवशंकर पाटील यांनी मानले.या कार्यक्रमास अक्कलकोट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सुमारे ५०० हून अधिक महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240




Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240