ग्रामपंचायतींसाठी १६ वा वित्त आयोग; स्वच्छतेसाठी ५० टक्के निधी राखीव.

 

नवरत्न थीमची प्रभावी अंमलबजावणी करा – यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

प्रतिनिधी -सोलापूर 

शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी ‘नवरत्न थीम’ची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावे स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध होतील, असे प्रतिपादन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते झाले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यशदाचे प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, प्रसाद काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की, १६ व्या वित्त आयोगाच्या ८० टक्के बेसिक ग्रँटपैकी ५० टक्के निधी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासाठी बंधनकारक स्वरूपात खर्च करावा लागणार आहे. तसेच अबंधित निधीपैकी किमान २५ टक्के निधी पंचायत विकास निर्देशांकानुसार निवडलेल्या एक किंवा दोन थीमवर खर्च करणे आवश्यक राहणार आहे. रस्ते विकास कामांसाठी २५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.घनकचरा व्यवस्थापनावर विशेष भर देताना त्यांनी सॅनिटरी नॅपकिन व डायपरची योग्य विल्हेवाट लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक घरामध्ये चार डस्टबीनच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे तसेच ग्रामपंचायतींनीही यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न आणि वित्त आयोगाच्या निधीचे अभिसरण करून विकासकामे राबविता येतील, असेही त्यांनी नमूद केले.

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना गुणवत्तेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगून ग्रामसभांमध्ये सर्व घटकांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गावपातळीवर कचरा वर्गीकरण आवश्यक – सीईओ कुशल जैन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील विकास आराखडे तयार करताना अचूक माहिती भरण्याचे आवाहन केले. नियोजनामध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी विशेष दक्षता घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार ओला, सुका आणि घातक कचरा यांचे स्वतंत्र वर्गीकरण करून त्यासाठी स्वतंत्र डस्टबीनची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गावपातळीवर कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास स्वच्छता अभियानाला अधिक बळ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील विकास आराखडे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आवाहन केले.या कार्यशाळेत यशदाचे वरिष्ठ प्रशिक्षक शांतकुमार स्वामी, राजेंद्र वारगड, हनुमंत कांदे आणि भीमराव तुळजापूरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------

🔹जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

🔹 संपादक-सिद्धार्थ भडकुंबे

🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240





Comments