उस्ताद झाकीर हुसैन यांचे दुःखद निधन ! संगीत विश्वावर शोककळा!
झाकीर हुसेन यांची तबल्यावर बोटांची इतकी हुकूमत होती की..निर्जीव चामड्यालाही आपल्या मर्जीप्रमाणे "बोलण्यास" भाग पाडत. तो हात आज शांत झाला.
इतका मोठा जागतिक कीर्तीचा कलाकार पण विम्रतेचा देहबोलीतून आविष्कार सतत दाखवत असे. कुठल्याही मंचावर आपली सांगीतिक सेवा देत देण्यासाठी येताना ते मंचाला नमस्कार करून लीन होऊन येत. आपल्या वडिलांकडून म्हणजे उस्ताद अल्लारक्खा यांचेकडून झाकीर हुसेन यांनी तबल्याचे प्राथमिक धडे घेतले. वयाच्या सातव्या वर्षापासून तबला शिकलेल्या आणि वयाच्या बाराव्या वर्षी पहिला रंगमंचीय कार्यक्रम देणारे झाकीर हुसेन अन् त्यावर स्वतःच्या कलेच्या कारकीर्दीतील चार "चाँद" लावत आपले नाव वडीलांपेक्षा मोठे केले. प्रत्येक बापाला हेच वाटत असते की, आपला मुलगा आपल्यापेक्षा सगळ्या अर्थाने मोठा व्हावा. नुसता तबला वाजवून त्यावर अनेक प्रयोग करत रेल्वे, घोड्यांच्या टापा, घुंगरू, शंख, असे अनेकविध आवाज लीलया काढायचे. तबल्याशी ते आपल्या कल्पनेप्रमाणे खेळायचेच असे म्हटले तरी ते अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण कल्पना करू शकतो की ते रियाज कसा व किती करत असावेत. कित्येक मोठमोठ्या कलाकारांना त्यांनी तबल्याची साथ केली आहे. साथ करताना त्यांच्या तबल्यावरील बोटांबरोबर त्यांचा चेहरा प्रसन्न, आणि त्या काढलेल्या बोलांना समर्पक असा असे. परंतु दुसऱ्या कलाकाराला साथ देताना त्याला त्याच्या कलेचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे सौजन्य झाकीर हुसेन यांच्या ठायी होते. पण त्यासोबत आपली तबल्यावरची हुकूमत दाखवून लोकांचे मनोरंजन करण्याचे औदर्यही त्यांच्याकडे होते. त्यांचे अनेक शिष्य आज तबल्याचे प्रशिक्षण घेत आहेत. होते. त्यांचे बहुतेक कार्यक्रम परदेशात होत असत. याचा अर्थ त्यांच्या कलेचे चाहते परदेशातही जास्त होते. तबल्याला पर्यायी शब्द म्हणजेच झाकीर हुसेन असे म्हटले तरी वावगे होणार नाही इतके त्यांचे या चर्म तालवाद्याशी नाते होते. त्यांना "पद्मश्री" आणि "पद्मविभूषण" अशा पदव्या मिळाल्या होत्याच. परंतु त्यांनी तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड मिळवले होते. विशेष म्हणजे त्यांनी 12 चित्रपटात कामही केले होते. त्यात एक शशी कपूर बरोबर तर एक शबाना आजमी बरोबर असे काम केलेले होते. परंतु ते तिथे रमले नाहीत. आणि संगीत हेच आणि त्यातही तबला हेच आपले कार्यक्षेत्र घेऊन त्या वाद्याला आणि स्वतःला त्याच्याशी निगडित ठेवत अजरामर केले. अशा या महान कलाकारास आज श्रद्धांजली अर्पण करताना मन भरून येत आहेत डोळेही नकळत पाणावत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रसाद अतनूरकर- सोलापूर
मो.नं-9422465501
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240