तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज - संतोष पवार.
प्रतिनिधी-सोलापूर
251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या गावभेट आणि प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चिंचपूर, टाकळी, औराद, नालंदा नगर, कुरघोट, औज, कारकल, लवंगी, भंडारकवठे, मंद्रूप या ग्रामीण भागांसह हत्तुरे वस्ती आणि नई जिंदगी या शहरी भागांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधत परिवर्तनाचा नवा हुंकार भरला.
"निधीची गप्पा आणि समस्यांचे दुर्लक्ष"
पवार यांनी आपल्या प्रचार सभेत प्रस्थापित नेत्यांवर टीका करताना म्हटले, "सध्याचे आमदार आणि नगरसेवक फक्त निधी आणल्याच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारींना पूर्णतः दुय्यम मानले जाते. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे."
पवार यांनी तालुक्यातील दयनीय परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, "गावागावांमध्ये ड्रेनेज लाईनचा अभाव, पाच दिवसांनी गढूळ पाणीपुरवठा, अपूर्ण दिवाबत्तीची व्यवस्था आणि खड्डेमय रस्ते ही गंभीर समस्या आजही कायम आहे. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना आवश्यक सेवांचा पुरवठा न करता महानगरपालिका जप्तीच्या नोटिसा पाठवून टॅक्स वसूल करते, ही दुर्दैवी बाब आहे."
"या समस्यांना केवळ निवडणुकांमध्ये भांडवल बनवणारे राजकारणी किती काळ सत्तेत राहणार? आता जनतेने या नेत्यांना उखडून टाकले पाहिजे. तालुक्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्यासाठी परिवर्तन अत्यावश्यक आहे. जनतेच्या विश्वासाने आणि आशीर्वादाने मी या निवडणुकीत दृढ संकल्पाने उभा आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याने मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देतो," असे संतोष पवार यांनी सांगितले.
"""प्रगतीसाठी नव्या नेतृत्वाला संधी द्या"
संतोष पवार यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, "तालुक्याच्या समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी मला संधी द्या. परिवर्तन घडवण्यासाठी तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे."
या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसेच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रचारसभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संतोष पवार यांना तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240